Categories
Solar Energy

घरगुती वापरासाठी सौर विद्युत प्रकल्पाचा आराखडा

प्रकल्पाची उद्दीष्टे


सोलर पॅनल च्या सहाय्याने वीज निर्मिती करून त्या विजेचा वापर घरामध्ये करता यावा यासाठी महावितरणच्या नेट मीटरिंग पॉलिसीनुसार प्रकल्प सुरू करणे.

विजेचे बिल जवळपास शून्य रूपये (स्थिर आकाराव्यतिरिक्त – वहन आकार, वीज शुल्क इत्यादी घटक धरून) यावे यासाठी सोलर पॅनेल्सची आवश्यक ती क्षमता ठरविली जाईल.

प्रकल्प उभारण्याचा प्रारंभिक खर्च पार्टिसिपेटरी पद्धतीने केला जाईल. त्यासाठी सेवाभावी संस्था आणि ज्या घरांमध्ये वीज वापरावयास द्यावयाची आहे त्यांच्याकडून काही प्रमाणात निधी उभारला जाईल.

प्रकल्पाचा दरमहा येणारा खर्च (यामध्ये प्रामुख्याने महावितरणला भरावयाच्या वीज बिलाची रक्कम समाविष्ट आहे) वापरकर्त्यांकडून भागविला जाईल. या प्रकल्पामध्ये बॅटरीची आवश्यकता नसते त्यामुळे दर दोन-तीन वर्षांनी बॅटरी बदलावी लागते तो खर्च इथे लागू होणार नाही.

या प्रकल्पाचा फायदा असा की वापरकर्त्यांना विज बिल खूप कमी येईल आणि त्यामुळे वीज बिल भरण्याची टाळाटाळ करण्याचे प्रमाण बरेच कमी होईल, अशा पद्धतीने हे महावितरण साठी सुद्धा सोयीचे राहील.

प्रकल्पाची संकल्पना

दोन किलोवॅट इतक्या क्षमतेचा सोलर नेट मीटरिंग प्रकल्प करावयाचा आहे. याचा खर्च साधारणपणे ९० ते ९५ हजार रुपये इतका होतो, यामधून दरमहा 210 युनिट इतकी घरगुती वापराची (सिंगल फेज) वीज उपलब्ध होते.

महावितरणच्या LT I (B): LT Residential या टेरीफप्रमाणे 210 युनिट साठी एकूण बिलाची रक्कम 1441 रूपये अधिक 102 रुपये स्थिर आकार (1543 रूपये) इतकी होईल. प्रतिवर्षी वीज बिलामध्ये 17292 रुपयांची बचत होईल.

या हिशोबाने प्रकल्पाचा खर्च साधारण साडे पाच वर्षांमध्ये वसूल होईल आणि त्यापुढे 18 ते 20 वर्षे मोफत वीज उपलब्ध होत राहील, यामध्ये महावितरण’कडून येणारे वीज बिल (ज्यामध्ये प्रामुख्याने फक्त स्थिर आकार असेल) मात्र दरमहा भरत राहावे लागेल.

प्रकल्पासाठी लागणाऱ्या सामग्रीचा तपशील

या प्रकल्पाकरीता खालील घटक / सामग्री / यंत्रणा आवश्यक असतात, दिलेली किंमत २ किलोवॅट क्षमतेसाठी आहे

  • सोलर पॅनेल्स – ४६००० रुपये
  • ग्रीड टाय इन्व्हर्टर – २३००० रुपये
  • वाहतूक खर्च – ४००० रुपये
  • विजेचा मीटर (नेट मीटर आणि जनरेशन मीटर) – ६००० रुपये
  • एम सी बी स्विचेस, केबल्स, इत्यादी – ७००० रुपये
  • पॅनल बसवण्यासाठी आधाराचे स्ट्रक्चर – ३०००
  • वीजमंडळाची वाढीव लोड फी, सोलर अर्जाची फी आणि मीटर तपासणी फी – ५००० रुपये
  • इंस्टॉलेशन चार्जेस – सहभागामधून करावयाचे असल्यामुळे ० रुपये धरले आहेत.

देखभाल दुरुस्तीविषयी

ह्या प्रकल्पामध्ये बॅटरी नसते म्हणून बॅटरीचे पाणी तपासणे किंवा तत्सम दुरुस्ती लागू होत नाही. तसेच दर २ ते ३ वर्षानी बॅटरी बदलण्याचा खर्च करावा लागत नाही.

पॅनल वर जमा होणारी धूळ १०-१५ दिवसामधून एकदा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या ऊन कमी असेल अश्या वेळी पाण्याने धुवून काढायला हवी.

दगडफेक आणि चोरी यापासून पॅनलचे संरक्षण करायला हवे. ह्या प्रकल्पाच्या उपयोगितेच्या अनुभवातून सामाजिक जाणीव निर्माण होईल तसतसे हे प्रकार बंद होतील.

याव्यतिरिक्त कुठलाही देखभाल दुरुस्तीचा खर्च नाही .

समूहयोजना

मोठ्या कुटुंबासाठी, ज्यांची २ – ३ – ४ स्वतंत्र घरे आहेत परंतु जवळजवळ किंवा एकत्र असतील त्यांनी हा प्रकल्प राबवल्यास एक विजेची जोडणी सोलर प्रकल्पासह घ्यावी. जेथे दरमहा विजेचा वापर खूपच कमी किंवा नगण्य असेल तेथे हा प्रकल्प तितकासा किफायतशीर होणार नाही. साधारणपणे दरमहा १८० किंवा अधिक युनिटे वापर असेल तर हा प्रकल्प खूपच सोयीचा आहे.

प्रकल्प बसवण्याच्या खर्चाची रक्कम योग्य आणि शक्य त्या मार्गाने गोळा करून प्रकल्प कार्यान्वित करता येईल.

त्यानंतर दरमहा वीजमंडळाकडून बिल येईल ते वापरकर्त्यांनी विभागून वाटून घ्यावे आणि बिल भरणा करावा.

वीज बिलाची रक्कम कशी ठरविली जाते?

त्या त्या महिन्यामधे सोलर पॅनल मधून निर्माण झालेली वीजेची युनिटे आणि घरामध्ये प्रत्यक्ष वापर झालेली वीजेची युनिटे यामधील फरकानुसार बिल ठरविले जाते.

एखाद्या महिन्यात वीजनिर्मिती जास्त झाली आणि विजेचा वापर कमी झाला तर जास्तीची युनिट आपल्याला पुढच्या महिन्यात वापरण्यासाठी उपलब्ध होतात.