Categories
सौरऊर्जा

सोलर इन्वर्टर असल्यास विजेचा वापर कमी कसा करावा?

सोलर पॅनल उपलब्ध असतील तर विज बिल कमी करण्यासाठी वायरिंग कसे असावे याचे विवेचन इथे वाचू शकता.

बहुतेक ठिकाणी सोलर पॅनल मधून बॅटरी चार्जिंग करू शकेल अशा पद्धतीचा बॅटरीवाला इन्व्हर्टर बसवलेला असतो. हा इन्व्हर्टर महावितरणच्या वीज पुरवठ्यातून सुद्धा बॅटरी चार्जिंग करू शकतो. जेव्हा सोलर पॅनल मधून वीज उपलब्ध आहे तेव्हा बॅटरी चार्जिंगसाठी महावितरणची वीज शक्यतो वापरली जात नाही.

सोलर पॅनल च्या क्षमतेनुसार बऱ्याच ठिकाणी असे पाहायला मिळते की दिवसाच्या सूर्यप्रकाशाच्या वेळात त्या ठिकाणचे बरेचसे लोड (म्हणजे विजेची उपकरणे) जवळपास पूर्णतया सोलर पॅनल मधून मिळणाऱ्या विजेवर चालवता येऊ शकते आणि तेवढ्या प्रमाणात महावितरण कडून वापरली जाणारी वीज कमी होऊ शकते.

मात्र यासाठी इन्व्हर्टर मध्ये एकतर सोलर प्रायॉरिटी चा ऑप्शन किंवा स्विच असायला हवा. तो स्विच कटाक्षाने ऑन ठेवता आला पाहिजे.

असा स्विच नसल्यास वायरिंग कसे करायचे ह्याची माहीती पुढे वाचावी.

या वायरिंग डायग्राम च्या संदर्भात माहिती वाचल्यास समजून घेता येईल.

इन्वर्टर ला सोलर पॅनल कडून येणाऱ्या चार्जिंग च्या वायर कायमस्वरूपी जोडलेल्या राहतील.

इन्व्हर्टर आणि बॅटरी मध्ये नेहमी आढळणाऱ्या जाड्या केबल सुद्धा कायम जोडलेल्या राहतील.

महावितरण कडून चार्जिंग साठी आलेली इनपुट 230 वोल्ट ची वायर थेट न जोडता त्यामध्ये एक एमसीबी(1) बसवावा.

इन्वर्टर च्या आउटपुट निघणाऱ्या 230 व्होल्टच्या वायरला बहुतेक ठिकाणी कुठलेच लोड जोडलेले नसल्याचे आढळून आले आहे, असे असल्यास इन्व्हर्टर मधून सोलरची वीज कधीही वापरली जाणार नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे. या वायर मध्ये देखील एक एमसीबी(2) बसवावा.

एमसीबी(2) मधून बाहेर आलेली वायर आपल्याला योग्य वाटतील तितक्या खोल्यांमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी जोडावी, या खोल्यांमध्ये सध्याच्या स्थितीत जर महावितरणचा थेट वीज पुरवठा आणलेला असेल तर तो पूर्णपणे कट करून आयसोलेट करावा.

जास्त प्रमाणात वीज खाणारी यंत्रणा जसे की पाण्याचा पंप, एअर कंडिशनर, वॉटर कुलर, जास्त क्षमतेचा प्रोजेक्टर, कॉम्प्युटर अशा गोष्टी महावितरणच्या थेट वीज पुरवठ्यावर चालवल्या जातील अशी वायरची जोडणी करावी. यांचे लोड इन्वर्टरवर देता येणार नाही.

इन्वर्टरच्या क्षमतेपेक्षा जास्त वीज त्याच्या आउटपुट मधून वापरली जाणार नाही या करता इन्व्हर्टरला जोडलेल्या खोल्या आणि महावितरणच्या वायरला थेट जोडलेली अन्य उपकरणे व काही खोल्या यांची विभागणी करायला हवी.

इन्वर्टरची क्षमता 500VA, 700VA, 900VA, 1100VA अश्या आकड्यांमध्ये दिलेली असते. प्रत्येक 100VA क्षमतेसाठी एक पंखा व एक दिवा चालवता येईल असे ढोबळमानाने गणित करून किती खोल्या इन्वर्टरला जोडल्या जाऊ शकतात हे ठरवावे.

समजा इन्वर्टर 800VA चा असेल तर त्यावर प्रत्येकी दोन दिवे व दोन पंखे असलेल्या चार खोल्या (म्हणजे एकूण आठ दिवे व आठ पंखे) जोडता येतील.

प्रत्यक्ष कामाच्या कालावधीमध्ये जर सतत व चांगला सूर्यप्रकाश असेल तर एमसीबी(1) कायम बंद ठेवून आणि एमसीबी(2) कायम चालू ठेवून इन्वर्टरला जोडलेल्या खोल्यांसाठी वीज पुरवठा सोलर मधून होईल आणि त्या प्रमाणात महावितरणच्या विजेचा वापर कमी केला जाईल.

कमी ऊन असल्यास किंवा काही कारणास्तव लोड जास्त झाल्यास इन्व्हर्टर ट्रिप करू शकतो अशावेळी एमसीबी(1) त्या दिवसापुरता चालू करून ठेवावा, जेणेकरून महावितरणच्या विजेने बॅटरी चार्ज केल्या जातील.

हे सर्व करत असताना आपल्याकडील महावितरणच्या मीटर मध्ये दर्शविला जाणारा के डब्ल्यू एच (kwh) युनिट वापर दररोज नोंदवून ठेवणे इष्ट ठरेल.

Leave a Reply

Connect with